९९ रुपयात शेतकऱ्यांसाठी आणावा बीएसएनएल शेतकरी सिम कार्ड फोरजी प्लॅन – वैष्णव भांगडिया

राज्यातील शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात मोबाईल सेवा आणि इंटरनेट सुविधा मिळण्यासोबतच त्यांना शेतीविषयक महत्त्वाची माहिती सहज मिळावी आणि संपर्काचा अडथळा येऊ नये यासाठी भाजप किसान मोर्चा प्रदेश सदस्य वैष्णव भांगडिया यांनी बीएसएनएलकडून विशेष मोबाईल योजना लागू करून घेण्याच्या मागणीचे निवेदन देत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ३० मार्च २०२५ रोजी सादर केले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आणि ते ज्या कुटुंबाचे प्रमुख आहेत अश्या कुटुंबासाठी सुलभ आणि स्वस्त मोबाईल प्लान्स उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकरी समुदाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे परंतु आधुनिक युगातही अनेक शेतकरी डिजिटल तंत्रज्ञानापासून दूर आहेत. मोबाईल डेटा आणि कॉलिंगच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय नियमित संपर्कात राहू शकत नाहीत. विशेषतः हवामान बदल, सरकारी योजना, नवे शेती तंत्रज्ञान आणि बाजारभाव यांसारखी महत्त्वाची माहिती वेळेत मिळावी यासाठी इंटरनेट आणि मोबाईल सेवा आवश्यक बनली आहे. त्यासाठी उपलब्ध असलेल्या भ्रमणध्वनी बिलांचे दर अधिक असल्याने अनेक शेतकरी हे सेवा नियमितपणे वापरू शकत नाहीत.

या पार्श्वभूमीवर बीएसएनएलने शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबप्रमुख असलेल्या व्यक्तींच्या संपूर्ण कुटुंबासाठी विशेष मोबाईल योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये दोन प्रमुख पर्याय असावेत त्यातील पहिला हा ९९ रुपयांचा प्लान, ज्यामध्ये २ जीबी प्रतिदिन डेटा, ३० दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळावेत. दुसरा पर्याय ९९९ रुपयांचा वार्षिक प्लान, ज्यामध्ये २ जीबी प्रतिदिन डेटा, ३६५ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस दरमहा असावेत. यामुळे शेतकरी आणि त्यांचे कुटुंब डिजिटलदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना शेतीशी संबंधित महत्त्वाची माहिती सहजगत्या मिळू शकेल.

शेतकऱ्यांपर्यंत ही योजना प्रभावीपणे पोहोचावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात नियमित शिबिरे आयोजित करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. बीएसएनएलची ४जी सेवा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये अंदाजे दहा लाख शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिबिरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेविषयी माहिती मिळेल आणि प्रत्यक्षरित्या ते या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

सध्या देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांसारख्या खासगी कंपन्या बाजारात मोठ्या प्रमाणावर वर्चस्व गाजवत आहेत त्यातील प्रमुख सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडून ग्रामीण भागात सेवा पुरवण्यावर अधिक भर दिला जातो. याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांसाठी खास योजना आणल्यास त्यांना परवडणाऱ्या दरात मोबाईल सेवा मिळू शकतात आणि बीएसएनएलला देखील उभारी मिळू शकते.

या निवेदनावर काही निवडक शेतकऱ्यांचे प्रतिनिधिक स्वरूपात सह्या घेतल्या असून सूरज लहाने आणि विलास शिरसाट हे देखील या वेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेने बीएसएनएलकडे अधिकृत पत्रव्यवहार करून ही योजना लवकरात लवकर मंजूर करून घ्यावी अशी मागणी करण्यात आली असल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरेल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *