झाडे कापण्याआधी आमचे मस्तक कापा; वैष्णव भांगडीया यांचा मुख्याधिकाऱ्यांना तीव्र हरकत अर्ज सादर!

राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ (अकोला–हिंगोली रोड) च्या नूतनीकरणाच्या नावाखाली प्रस्तावित करण्यात आलेल्या वृक्षतोडीविरोधात वाशिममध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत असून, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक वैष्णव भांगडीया यांनी नगर परिषद वाशिमचे मुख्याधिकारी यांना अत्यंत कठोर शब्दांत हरकत अर्ज सादर केला आहे. “एक-एक झाड म्हणजे एक-एक जीव आहे. झाडे कापण्याआधी आमचे मस्तक कापा,” अशा ठाम शब्दांत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे.

सदर अर्जात भांगडीया यांनी नमूद केले आहे की, महामार्गाच्या दुतर्फा उभी असलेली अनेक झाडे ही अनेक दशकांपासून परिसराचा अविभाज्य भाग असून, त्यातील काही झाडे इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात आहेत. ही झाडे केवळ सावली देणारी नसून, प्रदूषण नियंत्रण, तापमान संतुलन, पावसाचे पाणी धरून ठेवणे, पक्षी व प्राण्यांचे संरक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. अशा ऐतिहासिक व जीवनदायी झाडांची तोड करणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे नुकसान करण्यासारखे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वैष्णव भांगडीया यांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की, तीन वर्षांपेक्षा अधिक वय असलेले एकही झाड कोणत्याही परिस्थितीत तोडण्यात येऊ नये. तसेच तीन वर्षांखालील झाडे असतील तर ती तोड न करता नियमानुसार व शास्त्रीय पद्धतीने स्थलांतरित करण्यात यावीत. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देणे ही असंवेदनशील व चुकीची भूमिका ठरेल, असा आरोपही त्यांनी केला आहे.
जर प्रशासनाने या हरकतीकडे दुर्लक्ष करून एकाही झाडाची तोड केली, तर चिपको आंदोलन करून प्रत्यक्ष झाडांना मिठी मारून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. यासोबतच तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन, रस्ता रोको तसेच पर्यावरण रक्षणासाठी आमरण उपोषण करण्यात येईल, आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक या नात्याने वैष्णव भांगडीया यांनी संघाच्या पंच परिवर्तन या संकल्पनेतील एका महत्त्वाच्या परिवर्तन म्हणजे पर्यावरण संरक्षण या विषयावर विशेष भर दिला आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला पर्यावरण रक्षणाच्या या लढ्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करत, “प्रत्येक स्वयंसेवकाने झाडे वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढावी,” असे स्पष्ट आवाहन केले आहे.
या निवेदनामुळे शहरात वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवक व विविध सामाजिक संघटनांनी या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यास सुरुवात केली आहे. आता प्रशासन या गंभीर हरकतीवर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



