शेतकरी आणि सामान्य कुटुंबासाठी मुख्यमंत्री पवनचक्की योजना सुरू करा – वैष्णव भांगडिया

भाजप किसान मोर्चा सा. मा. पश्चिम विदर्भाचे प्रदेश सदस्य वैष्णव कविता सुशीलकुमार भांगडिया यांनी अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांना भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत निवेदन देत मुख्यमंत्री पवनचक्की योजना सुरू करण्याची मागणी केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला ७०% अनुदानावर पवनचक्की उपलब्ध करून देण्यात यावी अशी त्यांची विनंती आहे.
सध्या “प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना” आणि “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” या सौर ऊर्जेवरील योजना कार्यरत आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घरगुती वापरकर्त्यांना घरावर बसविलेल्या सौर पाट्यांमार्फत प्रति महिना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळते. “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” शेतकऱ्यांसाठी असून सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी या हेतूने सौर पंप दिले जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या क्षेत्रानुसार ३ ५ किंवा ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पंप दिले जातात.
भांगडिया यांनी निवेदनात नमूद केले कि पवनचक्की सौर पाट्यांच्या तुलनेत काही बाबतीत अधिक फायदेशीर ठरू शकते. पवनचक्कीचा वापर वाऱ्यावर आधारित असतो जो तिला रात्रीसुद्धा कार्यक्षम ठेवतो तर सौर पाट्या केवळ सूर्यप्रकाशावर अवलंबून असतात ज्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात त्यांची कार्यक्षमता कमी होते. पवनचक्की खूप कमी जागेत देखील प्रभावीपणे कार्य करू शकते कारण ती वाऱ्याच्या दिशेनुसार चालते तर सौर पाट्यांना मोठ्या आणि मोकळ्या जागेची आवश्यकता असते. पवनचक्कीला कमीत कमी देखभालीची आवश्यकता असते आणि ती दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी उपयुक्त ठरू शकते. सौर पाट्यांच्या तुलनेत पवनचक्की जास्त वेळ वीज उत्पादन करण्याची क्षमता राखते कारण ती नियमितपणे वाऱ्याच्या प्रवाहावर आधारित असते. त्यामुळे पवनचक्की पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन समाधान देणारा एक चांगला उपाय ठरतो. त्यामुळे मुख्यमंत्री पवनचक्की योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबासाठी ७०% अनुदानावर पवनचक्की उपलब्ध केल्यास शेतकरी व नागरिकांना वीज निर्मितीचा स्वस्त आणि टिकाऊ पर्याय सरकारने द्यावा अशी विनंती त्यांनी मान्यवरांना केली.

या कार्यशाळेत कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी शेतकऱ्यांना अपारंपरिक ऊर्जा योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच वैष्णव भांगडिया यांना आगामी अर्थसंकल्पात या योजनेचा समावेश कसा करता येईल यावर भर देण्याचे आश्वासन दिले. कार्यशाळेत पवनचक्की सौर ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जेच्या तांत्रिक बाजू वीज निर्मितीतील योगदान आणि सोबतच शेतकऱ्यांचे दुधाच्या भावाशी संलग्न असलेले प्रश्न बहुजन समाजाच्या प्रश्नांना न्याय ई विषयांवर चर्चा व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. अतुल सावे हे इतर मागास बहुजन कल्याण आणि दुग्धविकास या खात्याचे सुद्धा मंत्री असून त्यांच्यावर ३ खात्यांची धुरा ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविली आहे. कार्यशाळेत प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर आणि किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये भाजप किसान मोर्चाच्या सदस्य नोंदणी अभियानावर प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी ८८००००२०२४ या क्रमांकावर मिस कॉल देऊन भाजपचे सदस्य होण्यासाठी नागरिकांना भाजपशी जोडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.