घरपट्टी न भरणाऱ्यांचा सर्व शासकीय योजनांचा लाभ थांबविण्यात यावा – वैष्णव भांगडिया

राज्यातील शहरी व ग्रामीण भागात नागरिकांकडून घरपट्टी भरण्याकडे होणारे वाढते दुर्लक्ष शासनाच्या महसूलावर मोठा परिणाम घडवत आहे. गावांचा व शहरांचा सर्वांगीण विकास अडथळलेला असून मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य वैष्णव भांगडिया यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे की, “जे नागरिक सहा महिन्यांच्या आत घरपट्टी भरत नाहीत, त्यांचा सर्व शासकीय योजनांचा लाभ तात्काळ बंद करण्यात यावा.”
वैष्णव भांगडिया यांचे म्हणणे आहे कि “घरपट्टी ही केवळ कर नसून गावाच्या विकासाचा श्वास आहे. प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी समजून वेळेवर घरपट्टी भरली पाहिजे. अन्यथा गावांच्या प्रगतीला अडथळा येतो आणि शासनाचे उद्धिष्ट अपूर्ण राहतात.”
प्रत्येक मालमत्ताधारकासाठी डिजिटल केंद्रीकृत कार्ड तयार करावे. या कार्डवरून घरपट्टी भरण्याची स्थिती थेट तपासता यावी याबाबतही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. सूचना देऊनही जर एखादा नागरिक सहा महिन्यांत घरपट्टी भरत नसेल तर त्याला शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ देण्यात येऊ नये असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. घरपट्टी नियमित भरवणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना सुरु कराव्यात व वसुली प्रक्रिया डिजिटल व पारदर्शक ठेवावी अशी मागणीही त्यांनी केली.
महसूल मंत्री बावनकुळे भाजपच्या नवसंकल्प सभेसाठी रिसोड दौऱ्यावर आले असताना हे निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देताना गोपाल राऊत, राजू पाटील राजे, शंकर बोरकर, विनायक सांगळे, गजानन नवघरे, संजय देशमुख, मुदस्सीर शेख, गणेश कुटे, नवल शर्मा, नितीन काळे, विवेक माने, गणेश तिवारी, तेजस आरु, सुरेश मुंढे, प्रशांत वाघ, प्रांजली पाध्ये, रंगराव व्यवहारे, सूरज चौधरी यांच्यासह इतरही भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
निवेदनादरम्यान उपस्थितांनीही घरपट्टी वसुलीची गरज अधोरेखित करत शासनाने लवकरात लवकर कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचा या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शासनाने लवकर निर्णय घेऊन कार्यवाही करावी अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.